पिण्याच्या पाण्यात अळ्या; पिंपरी शहरातील अनेक भागांत दूषित पाणीपुरवठा; नागरिकांच्या आरोग्याशी खेळ | नळातून येणाऱ्या पाण्यात जिवंत अळ्या आढळल्याने महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
पिंपरी : शहरातील पाणीपुरवठा व्यवस्थेतील गंभीर हलगर्जीपणाचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. संत तुकाराम नगर, लांडगेवाडी, फुलेनगर, आकुर्डी, चिंचवड आणि कुदळवाडी परिसरातील पिण्याच्या पाण्यात अळ्या सापडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नळातून येणाऱ्या पाण्यात जिवंत अळ्या आढळल्याने महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
स्थानिक नागरिकांनी नळाचे पाणी भांड्यात भरल्यानंतर त्यामध्ये लहान अळ्या दिसल्या आहेत. काही भागांत पाणी गढूळ व दुर्गंधीयुक्त येत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. त्यामुळे या पाण्याचा वापर पिण्यासाठी तसेच स्वयंपाकासाठी करणे धोकादायक ठरत असल्याची भीती व्यक्त होत आहे. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर जलवाहिन्या, उंच पाण्याच्या टाक्या आणि डोहळे पॉईंट्सची नियमित स्वच्छता व निर्जंतुकीकरण करणे अपेक्षित असताना, संबंधित विभागाच्या निष्काळजीपणामुळे हा प्रकार घडल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे.






